Ayurveda Initiative for Global Health

Virechana Ayurvedic Therapy

Dr shweta Kulkarni Dombivli

“ऑक्टोबर हीट” भाग १

नमस्कार मी डॉ. श्वेता कुलकर्णी, MD आयुर्वेद,
या लेखात आपण ऊष्णतेमुळे होणारे विकार अन त्यांची चिकित्सा याविषयी जाणून घेणार आहोत.
ऋतुमानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे हवेतील उष्म्याचे प्रमाण स्वाभाविकरित्या वाढत चालले आहे. असे बदल सहन करताना शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यामुळे विविध प्रकारचे व्याधी निर्माण होऊ शकतात.
आयुर्वेद यावर उपाय निश्चितच सांगते.
आयुर्वेदिक चिकित्सेचा मूलमंत्र म्हणजे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ।
आतुरस्य विकार प्रशमनम् ।।
जय व्यक्तींचे आरोग्य चांगले आहे त्यांना आरोग्य रक्षणासाठी अन ज्यांना काही आजार झाले आहेत ते आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदाची कास धरणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर महिना म्हणजेच शरद ऋतू सुरू होतो तशी जाणवू लागते ती उष्णता , दाह जीला आपण सामान्यतः ऑक्टोबर हीट असे म्हणतो.वर्षा ऋतू मधील थंड हवा व गारव्याचे अचानक ऊष्णतेमध्ये होणारे रूपांतरण शरीराला सहजासहजी सहन होत नाही, त्यामुळे शरद ऋतू सुरू होतो तसे ऊष्णताजन्य विकार होणे दिसून येते.
ऋतुमानानुसार शरद ऋतूमध्ये स्वभावतःच पित्त दोषा चा प्रकोप होतो, या पित्त प्रकोपामुळे पुढील व्याधींची उत्पत्ती होते –

१.अम्लपित्त – Hyperacidity
शरद ऋतूमध्ये ऊष्णतेने वाढणारा विकार म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेत ऍसिडिटी असे संबोधित करतो.
यात छातीमध्ये जळजळ, खाल्लेले अन्न अपचित राहणे त्यामुळे आंबट ढेकर येणे, अन्न वरती आल्यासारखे वाटणे, गॅसेस , पोटात जळजळ ही लक्षणे सामान्यतः दिसून येतात.
काही रूग्णांमध्ये पित्त अतिरिक्त वाढल्याने उलटी होणे, विशेषतः आंबट उलट्या होणे हे लक्षण दिसून येते.हा आजार वरवर साधा वाटला तरी रूग्णाला अतिशय त्रासदायी ठरतो त्यामुळे या अतिरिक्त पित्ताला शरीराबाहेर काढणारी विरेचन, वमन यासारखी शोधन चिकित्साच उपयुक्त ठरते.

२.सदाह मूत्रप्रवर्तन – Burning Micturition
ऊष्णतेमुळे आपल्या शरीरातील नैसर्गिकरित्या मूत्रप्रवर्तन प्रक्रियेवरही परिणाम होतो.स्वाभाविक मूत्रप्रवर्तन न होता लघवीला जळजळ, मूत्र प्रवृत्तीचे प्रमाण कमी होणे, सकष्ट मूत्रप्रवर्तन या तक्रारी आढळून येतात.या तक्रारींवर आयुर्वेदोक्त चंदन, वाळा, अनंतमूळ यासारख्या औषधींनी सिद्ध चंदनादी पानक हे औषध उपयुक्त ठरते.

३.मुखपिटीका – Pimples
व्यावहारिक भाषेत ज्याला पिंपल्स म्हटले जाते असे लहान किंवा मोठ्या आकाराचे फोड ऊन वाढले की अधिक प्रमाणात येतात असे आढळून येते.
त्याचप्रमाणे अंगावर बारीक पुरळ येणे, तेथील त्वचेची आग होणे, त्यांवर खाज येणे ही लक्षणे ही दिसून येतात.
या त्वचाविकांवर रक्तशुद्धी ही मुख्य चिकित्सा ठरते.
या ऋतूत स्वभावतःच वाढलेल्या पित्तामुळे रक्तातील उष्णता वाढलेली असते.या उदरिक्त पित्ताला शरीराबाहेर काढण्यासाठी पंचकर्म चिकित्सा उपयुक्त ठरते.

४. शीतपित्त – Urticaria
व्यावहारिक भाषेत या विकाराला अंगावर गांधी उठणे असे म्हणतात.वाढलेल्या पित्तामुळे अंगावर फोड येणे, त्यांवर प्रचंड खाज येणे व बेचैनी वाटणे हे यात प्रामुख्याने दिसून येते.
यावर सर्वश्रेष्ठ म्हणजे वमन चिकित्सा होय.
वमन क्रियेमुळे अतिरिक्त पित्त शरीरातून निघून जाते व इतर कुठले औषध न घेताही हे शीतपित्त पूर्ण बरे होते.

५. डोकेदुखी – Migraine
पित्तप्रकृतीच्या व्यक्तीमध्ये वातावरणातील ऊष्णता वाढली की डोकेदुखी चा त्रास सुरू होतो, ऊन्हात गेले, ऊन्हातून जास्त वेळ चालले, प्रवास केला की डोके दुखणे सुरू होते , जे लवकर थांबत नाही.
काहीवेळा डोके दुखून उलट्या होतात अन उलटी झाल्यावर डोके दुखणे थांबते परंतु काही व्यक्तींमध्ये उलटी होऊनही डोके दुखणे थांबत नाही व थकवा जाणवतो.
अशा डोकेदुखी मध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचा खूप चांगला उपयोग झालेला दिसून येतो.
विशेषतः जुनाट डोकेदुखी असेल तर पंचकर्म चिकित्सेचा श्रेष्ठ उपयोग होतो.

★★शरद ऋतुमधील पंचकर्म चिकित्सा

★विरेचन –
औषधी घृत सेवन करून त्यानंतर अतिरिक्त पित्ताचे निर्हरण
करण्याच्या प्रक्रियेला विरेचन असे संबोधले जाते.

★वमन –
अतिरिक्त पित्ताचे घृतपान करून नंतर उलटीद्वारे ते पित्त शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला वमन असे संबोधले जाते.

★रक्तमोक्षण –
विशेषतः त्वचाविकार असताना शरीरातील दूषित रक्ताचे निर्हरण करण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण असे संबोधले जाते.

या चिकित्सा केवळ आजार असलेल्या व्यक्तींसाठी नाहीत तर ऋतुकालीन बदलांमुळे शरीरातील वाढलेले दोष काढून टाकण्यासाठी निरोगी व्यक्तीनेही करून घेणे आवश्यक आहे.
चला तर मग पंचकर्म चिकित्सेद्वारे शरीर शुद्धी करूया अन व्याधींपासून संरक्षण मिळवूया..!!!

©डॉ. श्वेता कुलकर्णी
M. D. Ayurved, M.A.Sanskrit
श्रीविश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय,
शॉप क्र.१, लक्ष्मी किरण को ऑप सोसायटी,
गोपाळ नगर लेन नं.२
डोंबिवली (पूर्व )
Contact –
9404216580
9892103109